विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते फिर्यादींना मुद्देमाल सुपूर्द; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य
पुणे (लोक मिरर टाइम्स) सुनील सांबारे पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या विविध गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून मोठी कामगिरी केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून जप्त करण्यात आलेले तब्बल २१८ तोळे सोने, ६ किलो चांदी आणि ४४ हजार रुपये रोख, असा एकूण सुमारे २ कोटी ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते हा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील बारामती तालुका, माळेगाव, दौंड, यवत, शिक्रापूर, जेजुरी, सासवड, राजगड, वेल्हा, खेड, मंचर, पारगाव, नारायणगाव, ओतूर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांचा पुणे ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून छडा लावत आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
सदर मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे आयोजित कार्यक्रमात हा मुद्देमाल परत करण्यात आला.
यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा म्हणाले की, नागरिकांच्या कष्टाची कमाई आणि मौल्यवान ऐवज चोरीला गेल्यानंतर तो लवकरात लवकर शोधून मूळ मालकांना परत करणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. तपास पथकाने दाखवलेली तत्परता आणि कौशल्यपूर्ण कामगिरी कौतुकास्पद असून, अशा कामगिरीमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होतो.
चोरीला गेलेला ऐवज पुन्हा आपल्या हाती मिळाल्याने फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाचे आभार मानत पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार (बारामती विभाग), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), पोलीस उपअधीक्षक मुख्यालय श्री. अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगावकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप सपकाळ, तसेच श्री. किशोर शेवते, सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण सपांगे, तपास पथकातील पोलीस अंमलदार आणि संबंधित फिर्यादी उपस्थित होते.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलिसांनी आपली कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.












