पोलिस प्रशासन न्यूज.

दिवाळीतील फटाक्यांच्या वादातून मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार; खुनाच्या प्रयत्नातील १९ वर्षीय आरोपीला गुन्हे शाखा युनिट-१ ने केले जेरबंद!


  1. पुणे | लोक मिरर टाइम्स. दिवाळीत फटाके वाजवताना रिक्षाच्या चाकाजवळ फटाका फुटल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी गणेश लक्ष्मण शेट्टी (वय १९, रा. ताडीवाला रोड, पुणे) याला पुणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले.

समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रमोद जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या आदेशाने पथकाने सापळा रचून गणेश शेट्टी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज राऊत, पोलीस अंमलदार प्रमोद जगताप, बाबा दांगडे, अनुसे, भुजबळ आणि आशिष खरात.

मार्गदर्शन : अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!