पुणे | प्रतिनिधी (लोक मिरर टाइम्स) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात दुकानांचे शटर उचकटून घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा पुणे गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी एकूण १० दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.
साजन ऊर्फ हर्षद रामू पवार (वय २५, रा. विमाननगर, लोहगाव, पुणे) आणि मंगेश ऊर्फ सोन्या विजय चव्हाण (रा. नानापेठ, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अंमलदार सचिन कोळी आणि पोलीस हवालदार किरण मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दारूवाला पुल परिसरात सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी तळेगाव दाभाडे येथे दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच लोणावळा शहर परिसरात ५ दुकाने आणि सासवड परिसरात ४ दुकाने फोडल्याचेही तपासात समोर आले.
आरोपींविरुद्ध तळेगाव दाभाडे, लोणावळा शहर आणि सासवड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, पुढील तपासासाठी दोघांनाही तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नेतृत्व
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाई करणारे पथक :
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड
- सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत
- पोलीस हवालदार समीर शेख
- पोलीस हवालदार किरण मोरे
- पोलीस अंमलदार आशिष खरात
- पोलीस अंमलदार सचिन कोळी













