पुणे:(टीम लोक मिरर टाइम्स )हडपसर येथील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या मोठ्या घरफोडीचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने उलगडा केला आहे. या प्रकरणी रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार (वय २५) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ७ लाख ५४ हजार रुपये रोख आणि २५.१ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल ४७ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने सलग दहा दिवस तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली. आरोपी म्हातोबाची आळंदी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुणा म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, सतीश वणवे, अमित सस्ते, झाकीर पठाण, समीर पांडुळे, अमित कांबळे, अश्विनी गायकवाड, अनिल जामगे, संभाजी गायकवाड, गणेश माने, अक्षय बांदल आणि संतोष राठोड यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.













