पोलिस प्रशासन न्यूज.

ओडिशातून पुण्याकडे गांजाची तस्करी; २३५ किलो गांजासह दोन आंतरराज्यीय तस्करांना अटक


शिरूर | दि. २६ नोव्हेंबर २०२६ओडिशा येथून गांजाची तस्करी करून पुणे शहरात पुरवठा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आंतरराज्यीय तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल २३५ किलो ३९० ग्रॅम गांजा, महिंद्रा XUV ७०० कार आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

दि. २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ओडिशातून हैदराबाद-सोलापूर मार्गे पुण्याकडे महिंद्रा XUV ७०० कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ चे पोलीस निरीक्षक जीवन माने यांना मिळाली होती. त्यानुसार पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचण्यात आला. संशयित कार दौंडमार्गे शिरूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच शिरूर पोलिसांना सतर्क करण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर यांनी न्हावरा जंक्शन, पुणे-नगर रोड आणि गोलेगाव रोडवरील सुंदर सृष्टी अपार्टमेंट परिसरात तीन ठिकाणी नाकाबंदी केली. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संशयित कार पोलिसांना दिसली. मात्र, चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून पहाटे ३.१५ वाजता स्टेट बँक कॉलनीतील सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत कारसह दोघांना ताब्यात घेतले.

कारची पंचांसमक्ष झडती घेतली असता डिकीमध्ये खाकी चिकटपट्टीने गुंडाळलेले १२८ गठ्ठे आढळून आले. त्यामध्ये २२ गोण्यांत भरलेला एकूण २३५ किलो ३९० ग्रॅम गांजा मिळून आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजय जगदीश मोहिते (वय ३०) आणि समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४), दोघेही रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती अशी आहेत.

या प्रकरणी पोलीस अंमलदार अर्जुन भालसिंग यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(क), २२(क), २५ आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा तस्करीचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ चे पोलीस निरीक्षक जीवन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक, शिरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग तसेच पोलीस अंमलदार अर्जुन भालसिंग, बालाजी मोटे, राजू मांगडे, पालवे, रतन भोसले, दीपक फुंदे आणि इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!