- पुणे ग्रामीण लोक मिरर टाइम्स जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि ओतूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ओतूर पोलीस ठाण्यातील तीन आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित कार दिसून आली. या कारचा ओतूरपासून नाशिकपर्यंत माग काढताना पोलिसांनी सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकमधील वडाळा, इंदिरानगर आणि लासलगाव परिसरातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी वसीम मुनीर पठाण (वय २९), अदनान युनूस पठाण (वय २६) आणि सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०) या तिघांना घरफोडीच्या गुन्ह्यांप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच चोरीचे चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे.
३८.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपींकडून १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार आणि वायरलेस वॉकी-टॉकी जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी गुन्हा करताना पकडले जाऊ नये यासाठी वॉकी-टॉकीचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या कारवाईत ओतूर पोलीस ठाण्यातील तीन आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस ठाण्याचे नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे आणि धनंजय पालवे यांनी सहभाग घेतला.














