पोलिस प्रशासन न्यूज.

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक


पुणे | टीम (लोक मिरर टाइम्स )येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलिसांनी तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बीड जिल्ह्यातील परळी येथून अटक केली आहे. नझीर मुस्तफा खान (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २००६ मध्ये दाखल झालेल्या अपहरण व इतर गंभीर गुन्ह्यात तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२००६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३६६(अ) आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीविरोधात फरार असल्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

आरोपीचा शोध घेत असताना तो वारंवार राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुण्यातील सय्यदनगर, हडपसर व लोहगाव तसेच जालना जिल्ह्यातील अंबड, बीड जिल्ह्यातील परळी व माजलगाव आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड परिसरात तो वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले. तो गवंडीकाम करून काही दिवसांनी ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.

तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जायभाय व साईनाथ मस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी परळी येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार परळी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुढील तपासासाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे आणि पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार विनोद कायगुडे, मुकुंद कोकणे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार आणि संदीप धादवड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!