पोलिस प्रशासन न्यूज.

सिंहगड कॉलेज परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणारा २३ वर्षीय तरुण अटकेत; एक जिवंत काडतूस जप्त


पुणे : (लोक मिरर टाइम्स )भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने सिंहगड कॉलेज कॅम्पस, आंबेगाव बुद्रुक परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र जप्त केले आहे. दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार संग्राम पवार आणि अभिनय चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील ‘द बाईक गॅलेक्सी’ दुकानासमोर एक तरुण अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध घेतला. यावेळी कुणाल भागवत शेटे (वय २३, व्यवसाय शिक्षण, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) हा तरुण आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त करून त्याला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४६/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगराव पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे तसेच पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, संग्राम पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे आणि मंगेश गायकवाड यांचा समावेश होता.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!