पुणे : (लोक मिरर टाइम्स) एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज) कारवाईअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश पारित झाल्यानंतरही फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला लक्ष्मीनगर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. निखिल मधुकर कांबळे (वय २२, रा. प्रज्ञासागर बुद्ध विहाराजवळ, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. येरवडा व लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत तसेच तडीपार गुन्हेगार असलेला निखिल कांबळे याच्यावर खराडी पोलीस ठाण्याकडून एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश पोलीस आयुक्तांनी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी पारित केले होते. मात्र, तो पोलिसांना मिळून येत नव्हता. दरम्यान, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे व तपास पथकातील कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राहुल परदेशी, अक्षय शिंदे आणि किरण भागीत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निखिल कांबळे हा आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येरवडा येथील गाडीतळ परिसरातील सरगम हॉटेलजवळ आला आहे. या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. यावेळी आरोपी पत्र्याच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या अभिलेखांची तपासणी केली असता, तो खराडी पोलीस ठाण्याकडील एम.पी.डी.ए. कारवाईतील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला खराडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्री. चिलुमुला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दिलीपकुमार वेडे, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, किरण भागीत, श्रीनाथ कांबळे, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, सूरज ओंबासे, भीमराव कांबळे, अमोल वायाळ, नितीन धायगुडे, कादिर शेख, दत्तात्रय शिंदे आणि सचिन कुचेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.














