पुणे | (प्रतिनिधी लोक मिरर टाइम्स) पुणे शहरातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटजवळील ब्लंडेड रोड येथे दुकान फोडून तीन लाख रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षित बालकाचा सहभागही निष्पन्न झाला आहे. आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी १ लाख ८ हजार ६४० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्लंडेड रोड, कॅम्प येथील ‘रिगल टी डेपो’ या दुकानात २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ ते २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजा तोडून दुकानातील तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत चोरीतील चिल्लर रक्कम घेऊन एक संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अबरार रियाज शेख (वय २३, रा. भीमपुरा, कॅम्प, पुणे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे असलेली चिल्लर चोरीच्या दुकानातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ती जप्त करून त्याला अटक केली.
पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात अबरार शेख याने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार निर्मल टिकराम सोनार (वय १९), सबील झैनोद्दीन शेख (वय १९) आणि आरीझ आयाज पटेल (वय २०) या आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली. तसेच एका विधिसंघर्षित बालकाचा सहभाग उघड झाला आहे.
आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी १ लाख ८ हजार ६४० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग शुभदा संखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे तसेच पोलीस अंमलदार अतुल मेंगे, संदीप उकिरडे, विजय कुंभार, शरद मारणे, निखिल जाधव, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडीलकर आणि महिला पोलीस अंमलदार अलका ब्राम्हणे यांनी केली.














