पुणे लोक मिरर टाइम्स शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सात आरोपींना जेरबंद केले असून, एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय सुभाष चव्हाण याचा भाऊ शुभम सुभाष चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कात्रज येथील रिलॅक्स हॉटेलमध्ये कट रचला होता. त्यानुसार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजीनगर न्यायालयात तारखेसाठी आलेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. तसेच धारदार शस्त्राने वार करून त्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपआयुक्त गुन्हे आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर पद्धतीने सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेची युनिट १, २, ३, ६, खंडणी विरोधी पथक १ व २, दरोडा विरोधी पथक १ तसेच शिवाजीनगर आणि आंबेगाव पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खालील सहा आरोपींना ताब्यात घेतले.
- अक्षय सुभाष चव्हाण (वय २०), रा. संतोषनगर, कात्रज, पुणे.
- अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८), रा. संतोषनगर, कात्रज, पुणे.
- स्वप्नील बाजीराव गवळी (वय २८), रा. संतोषनगर, कात्रज, पुणे.
- ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८), रा. आंबेगाव पठार, पुणे.
- सूरज साधू मळेकर (वय २२), रा. मोहननगर, धनकवडी, पुणे.
- सत्यम सदाशिव मोरे (वय २५), रा. कात्रज गाव, पुणे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, सातवा आरोपी अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ, पुणे) हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात सध्या येरवडा कारागृहात आहे. तपासादरम्यान शिवाजीनगर येथील खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात त्याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे. याशिवाय एका विधीसंघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, पोलीस उपआयुक्त संदीप भाजीभाकरे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, महेश सांगडे, वाहिद पठाण, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर, आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तसेच गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुणे शहरातील न्यायालयाबाहेर घडलेल्या या गंभीर हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेने वेगाने करत सात आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे.












