पुणे : टीम ( लोक मिरर टाइम्स)अपहार करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी खडक पोलिसांनी तब्बल २५ दिवस विशेष मोहीम राबवत मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी १० हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी जितेंद्र ऋषिकेश सिंह यांनी त्यांचा कामगार विशाल सत्यपाल चौहान याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आणि २८ लाख रुपये रोख असलेली बॅग मुंबईतील कार्यालयात जमा करण्यासाठी दिली होती. मात्र, विशाल चौहान याने मुंबईला न जाता वाटेतच बॅग घेऊन पलायन केले. तपासादरम्यान आरोपीचा भाऊ बिनेश चौहान, मित्र विकासकुमार जाधोन, राधेश्याम ऊर्फ पिकू चौहान आणि ब्रिजेश चौहान यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खडक पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज, गौतमबुद्धनगर तसेच उत्तराखंडमधील डेहराडून परिसरात शोधमोहीम राबवली. या कारवाईत विकासकुमार जाधोन याच्या घरातून १२० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे, किंमत १६ लाख ८० हजार रुपये, तर ब्रिजेश चौहान याच्या घरातून ७ लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि चांदीची चैन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.
मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार आणि समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे तसेच पोलीस अंमलदार विनोद शिंदे, मयूर भोसले, हेमंत पेरणे, निलेश साबळे ,अमित जमदाडे, विकास पांडुळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, संतोष साबळे आणि सागर कुडले यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांचे पथक करीत आहे.














