पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये ३, ५, १० आणि २१ किलोमीटर अशा विविध अंतरांच्या स्पर्धा होणार असून अंदाजे ३० हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे.
मॅरेथॉनचा मार्ग अलका टॉकीज चौक, फर्ग्युसन रोड, गणेशखिंड रोड आणि पाषाण रोड असा असणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून रविवार पहाटे २ ते सकाळी १० वाजेपर्यंत विविध रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार
- फर्ग्युसन कॉलेज रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद.
- अॅग्रीकल्चर कॉलेज चौक ते पुणे विद्यापीठ चौक मार्ग बंद.
- पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण सर्कल ते बावधन चौक मार्ग बंद.
- सेनापती बापट रोडवरील सिम्बायोसिस कॉलेज ते बी.एम.सी.सी. कॉलेज मार्ग बंद.
- सिमला चौकातून गणेशखिंड रोडवरील वीर चाफेकर चौक व सूर्यमुखी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद.
- स्वारगेटकडून टिळक रोडमार्गे अलका टॉकीज चौकाकडे जाणारी वाहतूक बंद.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
- कर्वे रोडवरून खंडोजी बाबा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नळस्टॉप चौकातून उजवीकडे वळून म्हात्रे पूल व शास्त्री रोडचा वापर करावा.
- जंगली महाराज रोडवरून येणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक किंवा झाशी राणी चौकातून पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- स्वारगेटकडून येणाऱ्या वाहनांनी पुरम चौकातून बाजीराव रोडने जावे.
- बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडमार्गे टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी सेवासदन चौकातून बाजीराव रोडचा वापर करावा.
- केळकर रोडवरून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी भिडे पुलाचा पर्यायी मार्ग वापरावा.
- सुस रोडकडून पाषाण सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांनी बालाजी चौकातून महाबळेश्वर हॉटेल चौक मार्गे जावे.
मॅरेथॉनसाठी येणाऱ्या स्पर्धकांनी नदीपात्रातील मार्गावर न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड आणि एस.पी. कॉलेजचे मुख्य मैदान वगळून परिसरात वाहने पार्क करावीत.
वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांनी केले आहे.
लोक मिरर टाइम्स | पुणे














