पोलिस प्रशासन न्यूज.

नाशिक ग्रामीणमधील गुन्ह्यातील आरोपीवर युनिट 1पुणे पोलिसांची कारवाई; दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी


पुणे : (टीम लोक मिरर टाइम्स) बँकेतून काढलेली रोकड मोजत असताना त्यातील एक नोट बनावट असल्याचे सांगून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तब्बल ३३ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले.
जॉन हुसैन परवेज ईराणी (वय ४८, रा. शिवाजीनगर, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दि. २५ जून २०२५ रोजी फिर्यादी व त्यांचे पती शेतीकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याने पिंपळगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेत गेले होते. त्यांनी त्यांच्या दोन्ही खात्यांतून प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण १ लाख रुपये काढले होते. बँकेतच पैसे मोजत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यातील एक नोट बनावट असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पैसे स्वतःकडे देण्यास प्रवृत्त करून त्यातून ३३ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जॉन हुसैन परवेज ईराणी हा शिवाजीनगर परिसरातील त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस हवालदार बाबा दांगडे व पोलीस हवालदार संतोष अनुसे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी माहितीची खातरजमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने शिवाजीनगर परिसरात जाऊन पाहिजे आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या वर्णनानुसार आरोपी आढळून आल्यानंतर त्याला दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर आरोपीला गुन्हे शाखा युनिट-१च्या कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबा दांगडे, पोलीस हवालदार संतोष अनुसे, पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार खरात, पोलीस हवालदार साळवे आणि पोलीस अंमलदार शेलार यांच्या पथकाने केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!