पुणे : (टीम लोक मेरा टाइम्स) शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले. रोहन रवि करडे (वय १९, रा. आई माता मंदिरामागे, गंगाधाम चौक शेजारी, अप्पर पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहन करडे याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१चे पथक कार्यरत होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार संतोष अनुसे तसेच पोलीस अंमलदार शेलार यांनी आरोपीचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, आरोपी रोहन करडे हा हर्षद चहा, टिळक रोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन माहितीची खातरजमा केली. मिळालेल्या वर्णनावरून संशयित इसमाची ओळख पटताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्याबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आरोपीने लोखंडी मुठीसह लोखंडी कोयता जवळ बाळगून शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार संतोष अनुसे
पोलीस हवालदार संतोष नागरे आणि पोलीस अंमलदार शेलार यांच्या पथकाने केली.














