*”आहे मी तुझ्याच प्रेमाचा अंकुर*
*का मला दाखवता मृत्यूचे दार*
*समजून नका मला डोईवरचा भार खरं सांगते माझ्यामुळे नाही होणार त्रास*
*समजून घ्या हो मला थोडं शिकून सोडून करीन मी समाजात नाव मोठं*”
गर्भातील मुलीची आर्त हाक मनाला अस्वस्थ करते. आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे; मात्र याच विज्ञानाचा गैरवापर करून काही ठिकाणी गर्भातील मुलगी आहे हे समजल्यानंतर तिचा जन्म होण्याआधीच गर्भपात केला जातो. हीच स्त्री-भ्रूणहत्या होय. मुलगा-मुलगी असा भेदभाव करून एका निष्पाप जीवाला जगण्याचा अधिकार नाकारणे ही गंभीर सामाजिक समस्या आहे.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि अन्नपूर्णा अशा अनेक रूपांत पूजले जाते. आपण स्त्रीशक्तीचा गौरव करतो; परंतु प्रत्यक्ष जीवनात मुलीला जन्म घेण्याचा अधिकार नाकारणे ही मोठी विसंगती आहे. ज्या समाजात स्त्रीचा सन्मान केला जातो, त्याच समाजात स्त्री-भ्रूणहत्या घडणे ही चिंतेची बाब आहे.
*“Behind every successful man, there is a woman.”* हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य, जिजाबाईंचे संस्कार, तसेच अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचे योगदान आपल्याला प्रेरणा देते. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचा ऐतिहासिक पुढाकार घेतला नसता, तर आज मुलींच्या शिक्षणाचा प्रवास इतका पुढे आला असता का? जिजाबाईंनी शिवरायांवर संस्कार केले नसते, तर स्वराज्याच्या इतिहासाला वेगळी दिशा मिळाली असती. स्त्री ही केवळ आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी नसून ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे.
आजच्या काळात मुली शिक्षण, विज्ञान, क्रीडा, कला, प्रशासन, संरक्षण, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम आणि अशा अनेक महिलांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे मुलगी ही ओझे नसून कुटुंबाचा आणि देशाचा अभिमान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
तरीही काही कुटुंबांत मुलगा हवा, वंशाचा दिवा हवा, म्हातारपणी आधार मिळावा किंवा हुंड्याची चिंता असते, अशा समजुतींमुळे मुलीच्या जन्माकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. मुलीच्या जन्मानंतर तिच्या शिक्षणाचा, लग्नाचा आणि सुरक्षिततेचा खर्च होईल, अशी भीती काही जणांच्या मनात असते. पण मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान संधी दिल्यास दोघेही कुटुंबाचा आधार बनू शकतात. मुलगी ही परकी नसते; तीही कुटुंबाचा अविभाज्य भाग असते.
*“*समाज में परिवर्तन लाती है बेटी*
*बेटी की कीमत उनसे पूछो जिनके पास नही है बेटी*”*
मुलीचे महत्त्व तिच्या जन्मामुळे कमी होत नाही. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला प्रेम, शिक्षण, सुरक्षितता आणि स्वावलंबनाची संधी देणे हे कुटुंबाचे व समाजाचे कर्तव्य आहे. मुलगी शिकली तर कुटुंब शिकते आणि समाजाची प्रगती होते. म्हणूनच
*“A mother is greater than hundred teachers”* असे म्हटले जाते. आईचे संस्कार मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गर्भलिंगनिदानाचा गैरवापर करून लिंगाच्या आधारे गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र केवळ कायदे करून ही समस्या पूर्णपणे सुटणार नाही. समाजातील मानसिकता बदलणे, मुलगा-मुलगी समान आहेत ही जाणीव निर्माण करणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहेत. या योजनांचा लाभ पात्र मुलींना मिळाला पाहिजे. शाळा, कुटुंब, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संस्था यांनी जनजागृती करावी. नाटक, पथनाट्य, व्याख्याने, लेख, पोस्टर आणि विविध उपक्रमांमधून स्त्री-भ्रूणहत्येचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवावेत. मात्र केवळ प्रचार पुरेसा नाही; मुलींना समान वागणूक देण्याची सुरुवात प्रत्येक घरातून झाली पाहिजे.
आपल्या देशात अनेक स्त्रियांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवले आहे. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, इंदिरा गांधी, किरण बेदी, कल्पना चावला आणि इतर अनेक महिलांनी आपल्या कार्याने समाजासमोर आदर्श ठेवला. त्यांच्या जीवनातून मुलींना संधी दिल्यास त्या किती मोठे कार्य करू शकतात, हे स्पष्ट होते.
मुलगी जन्माला येणे ही आनंदाची बाब आहे. तिचे स्वागत करा, तिला शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना बळ द्या आणि तिला स्वावलंबी बनवा. मुलगी ही केवळ कोणाची तरी मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई नसून ती स्वतःच्या विचारांची, क्षमतांची आणि स्वप्नांची स्वतंत्र व्यक्ती आहे. तिच्या अस्तित्वाचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
“बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येकाच्या आचरणात उतरला पाहिजे. मुलगी वाचली तरच कुटुंब, समाज आणि देश समृद्ध होईल. स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्यासाठी आपण सर्वांनी भेदभावमुक्त विचार स्वीकारूया आणि प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्याचा अधिकार देऊया.
*जिजाई नसती तर स्वराज्याची प्रेरणा नसती; अहिल्याबाई नसत्या तर लोककल्याणाचा आदर्श नसता; सावित्रीबाई नसत्या तर मुलींच्या शिक्षणाचा इतिहास वेगळा असता.*
म्हणूनच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि तिच्या स्वप्नांना नवे आकाश द्या.
सौ. स्मितल संतोष गायकवाड
उपशिक्षिका
मनपा शाळा कोद्रेवस्ती, हडपसर














