पिंपरी-चिंचवड (टीम लोक टाइम्स)
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत २४९ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एमडी ड्रग्ज, ज्युपिटर मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत वाकड परिसरातील विनोदे कॉर्नर येथे एक इसम एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रमेंद्र सिंह भेरू सिंह (वय ३१, रा. खुडाला फालना, जिल्हा पाली, राजस्थान) याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता १२ लाख ४५ हजार रुपये किमतीचे २४९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन मोबाईल फोन आणि ज्युपिटर मोटारसायकल असा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपासादरम्यान या प्रकरणात मदत करणारा साथीदार दिनेश कुमार मगाराम चौधरी (वय २८, रा. खुडाला फालना, जिल्हा पाली, राजस्थान; सध्या रा. फडके हौद चौक, रविवार पेठ, पुणे) यालाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिद्धराम म्हेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात हिंजवडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील ड्रग्जविरोधी मोहिमेला बळ मिळाले आहे.














