पुणे( टीम लोक मिरर टाइम्स) गंभीर गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने अटक केली आहे. शिवा भीमराव कांबळे (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार बाबा दांगडे आणि संतोष अनुसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी शिवा कांबळे हा मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर परिसरातील हरिओम मठाजवळील ओम सुपर मार्केट परिसरात आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयित आरोपी आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदर आरोपीविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७८/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेची कलमे ३२६, ३२३, १४३, १४७, १४८, १४९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१), ३७(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
या पथकाने केली कामगिरी
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त मुख्यालय तथा गुन्हे शाखेचे अतिरिक्त कार्यभार असलेले पी. आर. पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक धिरज राऊत, पोलीस हवालदार बाबा दांगडे, संतोष अनुसे, संतोष नागरे, आशिष खरात, समीर शेख आणि पोलीस अंमलदार अमोल पाटील यांनी ही कामगिरी केली.
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.














