पुणे (सुनील सांबारे) लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी माध्यमे, कायदा आणि सुव्यवस्था राखणारी पोलीस यंत्रणा आणि या संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेली सर्वसामान्य जनता, हे तिन्ही घटक एकमेकांपासून वेगळे नाहीत. एकमेकांच्या सहकार्यानेच समाजव्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते. मात्र, आज काही ठिकाणी या तिन्ही घटकांमधील संवाद आणि समन्वय हरवत चालला आहे का, असा प्रश्न मनात निर्माण होतो. पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रसंग आला की काही अनुभव मनाला अस्वस्थ करून जातात. एखादा नागरिक आपली अडचण घेऊन येतो, एखादा माध्यम प्रतिनिधी समाजातील प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांसमोर उभा राहतो. समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे आहे, तिची अडचण काय आहे, हे ऐकून घेण्याआधीच काहींच्या वागण्यातून एक वेगळीच भावना जाणवते.
कानात हेडफोन, समोर लॅपटॉप, हातात मोबाईल, चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष… कधी हाताने थांबण्याचा इशारा, तर कधी बोलण्याची अशी पद्धत की समोरची व्यक्ती तिला काही कामच नाही तुच्छ आहे एखादा भिकारी कसा दारात येतो असं भिकारी आपल्या दारात काही मागायला आलाय अशी मनस्थिती असते त्या व्यक्तीची आणि मग हळुवारपणे त्या व्यक्तीच्या मनात राग निर्माण होत राहतो आणि मग नकळत मनामध्ये तेढ निर्माण होऊन वेगळ्या मार्गाकडे पाऊल उचलला जातो मग कशा पद्धतीने आपण जवळीकता साधण्याचा प्रयत्न करायचा हाही विचार त्यांच्या मनात येऊन जातो म्हणतात ना चहा पेक्षा किटली गरम हा अनुभव नक्की येत असतो
खरंच, एखाद्या व्यक्तीला दोन मिनिटे ऐकून घेणे एवढे कठीण आहे का?
समोर उभा असलेला माणूस हा केवळ एक व्यक्ती नसतो; तो कदाचित एखाद्या समस्येने त्रस्त असतो, न्यायाच्या अपेक्षेने आलेला असतो किंवा अनेक लोकांचा आवाज घेऊन आलेला असतो.
माध्यम प्रतिनिधी कोणत्या वृत्तपत्रातून काम करतो, कोणत्या डिजिटल पोर्टलशी जोडलेला आहे, त्याचे कार्यक्षेत्र किती मोठे आहे, त्याची ओळख किती आहे, यावरून त्याला मिळणारी वागणूक ठरवली जाणार असेल, तर पत्रकारितेच्या मूळ उद्देशालाच प्रश्न निर्माण होतो. माध्यमाचे नाव मोठे असो किंवा छोटे, त्यामागे काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान आणि त्याने मांडलेल्या सामाजिक प्रश्नाचे महत्त्व कमी होत नाही. कारण बातमीचे मूल्य माध्यमाच्या नावावर नाही, तर त्या बातमीमागील सत्यावर ठरते. तो कोणत्या भावनेने आला आहे त्यावर ठरते
हेच सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतही लागू होते. एखादा गरीब, सामान्य किंवा प्रभावशाली नसलेला माणूस पोलीस स्टेशनमध्ये आला, तर त्याला कमी महत्त्व दिले जावे का? त्याच्याकडे मोठी ओळख नाही म्हणून त्याच्या समस्येचे गांभीर्य कमी होते का? न्याय मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सन्मान मिळण्यासाठी कोणाची शिफारस किंवा ओळख आवश्यक असावी का?
प्रत्येक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असा असतो, असे नाही. अनेक अधिकारी स्वतःच्या कर्तव्यापलीकडे जाऊन नागरिकांना मदत करतात. संकटाच्या वेळी धावून जातात, रात्रंदिवस काम करतात आणि स्वतःच्या कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्या कामाचा, त्यागाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा निश्चितच आदर केला पाहिजे.
पोलिसांच्या कामाचा ताण किती असतो, याची कल्पना करणेही अनेकदा कठीण असते. सण असो किंवा उत्सव, घरात आनंदाचा प्रसंग असो किंवा वैयक्तिक अडचण, गणवेशातील कर्तव्य अनेकदा सर्वांपेक्षा मोठे ठरते. गुन्हेगारी घटनांचा तपास, वरिष्ठांचा दबाव, कायदा आणि सुव्यवस्था, नागरिकांच्या तक्रारी अशा अनेक जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात.
माध्यमांनाही या वास्तवाची जाणीव आहे. म्हणूनच पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करणाऱ्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमे करतात. पोलिसांच्या मेहनतीला प्रसिद्धी मिळावी, त्यांच्या चांगल्या कामातून समाजात सकारात्मक संदेश जावा, हीदेखील माध्यमांची भूमिका असते.
पण एकीकडे पोलिसांच्या चांगल्या कामांना समाजापर्यंत पोहोचवणारी माध्यमे आणि दुसरीकडे त्याच माध्यम प्रतिनिधींना संवादासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर ही विसंगती नक्कीच विचार करायला लावणारी आहे.
प्रश्न असा आहे की, पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून अनेक उपक्रम राबवले जातात. जनसंवाद, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, पोलीस मित्र अशा संकल्पना पुढे आणल्या जातात. मात्र, प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्येच जर संवादाची दारे बंद असल्यासारखी परिस्थिती असेल, तर या उपक्रमांचा खरा अर्थ काय उरतो?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ अहवालांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींना येणाऱ्या अनुभवांतूनही परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. कारण एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो.
माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. पोलिसांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप न करता, तपासाची गोपनीयता आणि कायदेशीर मर्यादा जपल्या पाहिजेत. मात्र, प्रश्न विचारणे, माहिती मागणे आणि जनतेच्या समस्या मांडणे हा माध्यमांचा अधिकार आणि लोकशाहीतील महत्त्वाचा भाग आहे.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, अधिकार मिळाला म्हणून समोरच्या माणसाच्या भावनांना पायदळी तुडवण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही.
आज एखादा नागरिक तुमच्यासमोर मदतीच्या अपेक्षेने उभा आहे. उद्या कदाचित तुमच्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती दुसऱ्या कार्यालयात मदतीसाठी उभी असेल. तेव्हा तिलाही अशीच वागणूक मिळाली, तर काय वाटेल? हा विचार प्रत्येकाने स्वतःला एकदा तरी विचारायला हवा.
खुर्चीवर बसलेली व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली, तरी त्या खुर्चीवर बसण्यामागे समाजव्यवस्थेने दिलेली जबाबदारी असते. ती खुर्ची कायमची नसते, पद कायमचे नसते आणि अधिकारही कायमचे नसतात. मात्र, आपण एखाद्याशी कसे वागलो, त्याला किती सन्मान दिला, हे त्याच्या मनात कायम राहते.
शेवटी एवढेच…
खाकीचा सन्मान जनतेच्या मनात आहे, माध्यमांच्या लेखणीत समाजाचा आवाज आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर लोकशाही उभी आहे. या तिन्ही घटकांमध्ये अहंकाराची भिंत उभी राहिली, तर त्याचा सर्वाधिक त्रास सामान्य माणसालाच सहन करावा लागेल.
पोलिसांनी जनतेला समजून घ्यावे, माध्यमांनी पोलिसांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि जनतेनेही दोघांच्या जबाबदाऱ्या ओळखाव्यात.
कारण गणवेशाचा रुबाब काही क्षणांसाठी असतो, पदाचा अधिकार काही काळासाठी असतो; पण माणसाला दिलेला सन्मान आयुष्यभर लक्षात राहतो.
प्रश्न एवढाच आहे… आपण जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय की नकळत तोच विश्वास गमावत चाललो आहोत?
हा प्रश्न केवळ पोलिसांसाठी नाही, तर माध्यमे आणि सर्वसामान्य जनतेसह संपूर्ण व्यवस्थेसाठी आत्मपरीक्षणाचा आहे.
“हा लेख कोणत्याही व्यक्तीला किंवा पोलीस दलाला बदनाम करण्याच्या उद्देशाने लिहिलेला नाही. उलट, पोलीस दलाविषयी समाजात असलेला आदर आणि विश्वास अधिक दृढ व्हावा, हीच यामागची भावना आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या मुद्द्याची दखल घेऊन प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमधील संवादपद्धती आणि नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीचा आढावा घ्यावा, एवढीच अपेक्षा आहे. कारण एखाद्या नागरिकाचा अपमान हा केवळ एका व्यक्तीच्या मनाला लागलेला धक्का नसतो, तर तो संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासाला बसलेला तडा असतो.”













