पोलिस प्रशासन न्यूज.

दृष्टिहीन व विशेष मुलांच्या स्वावलंबनासाठी एकता मित्र मंडळाचा माणुसकीचा उपक्रम!


पुणे : सुनील सांबारे ( लोक मिरर टाइम्स) दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि दृष्टिहीन व विशेष मुलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने एकता मित्र मंडळ (ट्रस्ट), अरण्येश्वर आणि लुई ब्राईल अंध मुला-मुलींची संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक हात मदतीचा… मदतरूपी खरेदीचा!’ या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी तावरे कॉलनी, पर्वती येथील एकता मित्र मंडळ सभामंडपात दिवाळी साहित्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सामाजिक बांधिलकी जपली.

या प्रदर्शनात दृष्टिहीन व विशेष मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील, उटणे, अगरबत्ती, धूप, कापूर तसेच विविध गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी या वस्तूंची खरेदी करून मुलांच्या मेहनतीला दाद दिली. विशेष म्हणजे, ₹५०, ₹१०० आणि इच्छेनुसार अधिक रकमेच्या वस्तू खरेदी करत नागरिकांनी या मुलांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला हातभार लावला.

यावेळी श्री गणरायाची आरती करण्यात आली. तसेच या सामाजिक उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या नूतन केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांचा एकता मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

“दानापेक्षा संधी मोठी आणि सहानुभूतीपेक्षा स्वाभिमान मोलाचा!” हा विचार या उपक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आला. विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करणे म्हणजे केवळ मदत नव्हे, तर त्यांच्या कौशल्याचा सन्मान करून त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहन देणे होय, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

‘यंदाची दिवाळी… माणुसकीच्या प्रकाशाने उजळूया!’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिवाळीच्या सणाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली. या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे, खरेदीदारांचे, लुई ब्राईल संस्थेचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे एकता मित्र मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!