पुणे : टीम( लोक मिरर टाइम्स )बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या नागरिकांना मदतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम घेणे आणि पैसे ट्रान्सफर केल्याचा बनाव करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित सुभाष चव्हाण (वय २५, रा. फुरसुंगी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरात एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पैसे ट्रान्सफर करून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कामशेत येथील शिवाजी चौक परिसरातील राज मोबाईल शॉपी येथे संशयित आरोपीचा शोध घेतला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने अशाच प्रकारचे दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत एक मोबाईल फोन, ऑटो रिक्षा आणि इतर साहित्य असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमुळे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एक आणि खराडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार ढोके व तपास पथकाने केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत.














