पिंपरी-चिंचवड : टीम (लोक मिरर टाइम्स)गंभीर गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आणि तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने जांभुळगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले. नारायण सोपान दाभाडे (वय ४१, रा. जांभुळगाव, व्हिजन सिटी, प्लॅट नं. ३०४, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९६/२०२३ मध्ये भारतीय दंड विधान कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो गेल्या चार वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी जांभुळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नारायण दाभाडे याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी, अपहरण, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्स लुटण्याचा कट, दरोड्याचा प्रयत्न आणि गांजा विक्री अशा गंभीर स्वरूपाचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहीदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार असवले, पोलीस हवालदार सोनटक्के आणि पोलीस शिपाई मुंडे यांच्या पथकाने केली.














