पुणे पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने आंबेगाव परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. प्रणव विजय सणस (वय १८ वर्षे २२ दिवस, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.
दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अविनाश दळवी यांना गुप्त बातमीदारामार्फत प्रणव सणस याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. तो आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात स्वाद हॉटेलजवळ, श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर थांबला असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्या खिशात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आढळले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला आंबेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक धिरज राऊत तसेच पोलीस हवालदार संतोष नागरे, समीर शेख, अतुल साळवे, निखिल अहिवळे, सचिन कोळी आणि अविनाश दळवी यांनी सहभाग घेतला.














