पुणे | प्रतिनिधी पुण्यातील रविवार पेठ परिसरात घराचे कुलूप तोडून तब्बल २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरी करणाऱ्या काका-पुतण्याला खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावत चोरीस गेलेल्या सोन्यासह अतिरिक्त ४६ ग्रॅम सोनेही हस्तगत केले. जप्त केलेल्या एकूण सोन्याची किंमत २ कोटी २४ लाख ८६२ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील फिर्यादी मोहम्मद तौफीक रज्जाक खान (वय ३६, रा. रविवार पेठ, पुणे) हे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. विविध सोनार त्यांच्याकडे दागिने बनविण्यासाठी सोने देत असतात. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८.१५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांची पत्नी घरी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे २ कोटी २० लाख रुपये किमतीचे २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरी करून नेली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यावेळी फिर्यादी राहत असलेल्या इमारतीखाली दोन इसम संशयास्पदरीत्या घुटमळताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली असता, हे दोघेही त्याच परिसरात राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुस्तफा नजीर शेख (वय ३६, व्यवसाय – भंगार) आणि सरफराज ऊर्फ आवेज मैनुद्दीन शेख (वय २२, व्यवसाय – चावी बनविणे) या काका-पुतण्याला ताब्यात घेतले. दोघेही रविवार पेठ परिसरातील रहिवासी आहेत. तपास पथकाने कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
- पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले संपूर्ण २ किलो २०० ग्रॅम सोने हस्तगत केले. याशिवाय अतिरिक्त ४६ ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण २ किलो २४६ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची किंमत २ कोटी २४ लाख ८६२ रुपये आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मुद्देमालापेक्षा अधिक सोने जप्त करण्यात आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धंनजय पिंगळे, शर्मिला सुतार, राहुल मखरे, दाढे, खाडे, संतोष मोहिते, विनोद शिंदे तसेच पोलीस हवालदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे आणि पोलीस अंमलदार निलेश साबळे, विकास पांडोळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, कुडले व इतर कर्मचाऱ्यांनी या तपासात सहभाग घेतला.
अवघ्या १२ तासांत या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून मोठ्या प्रमाणात सोने हस्तगत केल्याने खडक पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.














