पोलिस प्रशासन न्यूज.

औंध परिसरात महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद; ३.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे (लोक मिरर टाइम्स) दिनांक ४ नोव्हेंबर २०२६औंध परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास औंध परिसरातून एक महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केले होते. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५००/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सलग दहा दिवस औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरात पाठलाग करून राजाभाऊ उर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. आर्वी गाव, साई रोड, जि. लातूर; मूळ रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) याला ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल तसेच महिलेचे हिसकावून नेलेले मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक शहर आणि सातारा येथे ७० पेक्षा अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ चिलुमुला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनानवळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शीतल जाधव यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तसेच पोलीस अंमलदार शिर्के, बाबुलाल तांदळे, वाधेश कांबळे, भुवनेश पवार, रविंद्र दहातोंडे, अजित गायकवाड, योगेश बडगे आणि सूर्यकांत मानकुंबरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!