पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे १२ गुन्हे उघड; १५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे :टीम(लोक मिरर टाइम्स )पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून पुणे ग्रामीणमधील १० आणि सोलापूर ग्रामीणमधील २ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल फोन असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक सुबोध बाळुज व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत इंदापूर परिसरात संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे-सोलापूर बायपास रोडवरील जगदंब हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचला. काही वेळात मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान मोबाईल उर्फ हरी पवार (वय २२, रा. पंढरपूर) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून युनिकॉर्न (MH-13-EQ-4910) आणि स्प्लेंडर (MH-13-DW-2723) या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांबाबत पंढरपूर व करकंब पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. तसेच खडकी येथील घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल फोनही मिळून आला.

दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात शक्तिमान हुकूम्या काळे (वय २२, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला अटक करण्यात आली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोड्याचा १, जबरी चोरीचा १ आणि घरफोडीचे ८, तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे २ असे एकूण १२ गुन्हे केल्याची कबुली दिली. या कारवाईत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस ठाणे करीत आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!