पोलिस प्रशासन न्यूज.

स्वारगेटमधील जबरी चोरीचा गुन्हा उघड; मार्केटयार्डमधील ३० लाखांच्या दरोड्याचाही पर्दाफाश, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे : टीम (लोक मिरर टाइम्स)व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. तपासादरम्यान याच आरोपींनी मार्केटयार्ड परिसरात व्यापाऱ्याच्या ३० लाख रुपयांच्या रोकड असलेल्या बॅगेवर दरोडा टाकल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून कार, दुचाकी, मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे आणि रोख रकमेसह एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सॅलेसबरी पार्क येथील गोलीवाला भवन परिसरात एका व्यावसायिकाला तीन अज्ञात आरोपींनी अडवून धारदार लोखंडी हत्याराने वार करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील पाच लाख रुपये असलेली बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळासह मार्केटयार्ड, बिबवेवाडी, वानवडी, कोंढवा, हडपसर, मगरपट्टा सिटी, केशवनगर आणि मुंढवा परिसरातील सुमारे ३०० ते ३५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये यश प्रविण सोनवणे (वय २४, रा. मांजरी) आणि निहाल नवनाथ अडागळे (वय १९, रा. मुंढवा) यांच्यासह अन्य साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला. पुढील तपासात आरोपींनी दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मार्केटयार्ड रोडवर एका व्यापाऱ्याच्या ३० लाख रुपये असलेल्या बॅगेवर दरोडा टाकल्याचेही उघड झाले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१३/२०२६ दाखल आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, कपडे, दोन मोबाईल, आय-२० कार, बुलेट दुचाकी, अॅपल आयफोन १८ प्रो, साडेचार तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे तोडे, दोन अँप्पल वॉच, एक महिला घड्याळ आणि ६ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पथकाने केली कारवाई : ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप सिंग सिसोदे यांच्या आदेशानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसट, पोलीस अंमलदार प्रदीप शिंदे, किरण रघतवान, अक्षय भोगे, रमेश चव्हाण, नितीन क्षिरसागर, सोमनाथ बटुळे, युवराज राठोड, रोहित पोवार आणि करण ढापकर यांनी ही कामगिरी केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!