पुणे, दि. १० ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कौशल्य, शिस्त, शारीरिक क्षमता आणि व्यावसायिक दक्षतेचे दर्शन घडविणाऱ्या २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ चा समारोप शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक २, पुणे येथील परेड ग्राउंडवर उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात विविध स्पर्धांतील विजेत्या संघांना फिरते चषक प्रदान करून गौरविण्यात आले.
समारंभाच्या प्रारंभी बँड पथकाने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री. सुनील रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. सदानंद दाते यांचे स्वागत केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी स्पर्धा आणि मेळाव्याविषयी माहिती देण्यात आली.
दहशतवाद विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
या मेळाव्यात दहशतवाद विरोधी पथकाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर नागपूर शहर संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. गुन्हे अन्वेषण विभागाचा शताब्दी फिरता चषकही दहशतवाद विरोधी पथकाने जिंकला. अल्पावधीत स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले.
विविध स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुढील संघांना आणि स्पर्धकांना फिरते चषक प्रदान करण्यात आले. सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन स्पर्धेत नागपूर शहर, पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत कोकण परिक्षेत्र, पोलीस व्हिडीओग्राफी स्पर्धेत दहशतवाद विरोधी पथक, माहिती तंत्रज्ञान प्राविण्य स्पर्धेत नांदेड परिक्षेत्र, श्वान स्पर्धेत एसआरपीएफ परिक्षेत्र आणि घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत एसआरपीएफ परिक्षेत्राने यश संपादन केले. कै. अशोक कामटे फिरता चषक दहशतवाद विरोधी पथकाला, तर उत्कृष्ट डॉग चषक कोल्हापूर परिक्षेत्रातील ‘आझाद’ या श्वानाला प्रदान करण्यात आला.
पोलीस महासंचालकांकडून स्पर्धकांचे कौतुक
प्रमुख पाहुणे श्री. सदानंद दाते यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करताना पोलीस कर्तव्य मेळावा ही केवळ स्पर्धा नसून पोलीस दलातील शिस्त, कौशल्य, शारीरिक क्षमता, मानसिक तयारी आणि संघभावनेचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले.
स्पर्धकांनी दाखविलेली मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि संघभावना आदर्शवत असल्याचे नमूद करून या स्पर्धांमधून केवळ शारीरिक ताकद किंवा शस्त्रकौशल्यच नव्हे, तर धैर्य, सजगता आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची तयारीही अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून समाजात सुरक्षितता, विश्वास आणि शांतता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेत यश न मिळालेल्या स्पर्धकांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. प्रत्येक प्रयत्नातून नवीन शिकायला मिळते आणि त्यातून अधिक प्रगती करण्याची क्षमता विकसित होते, असे सांगत त्यांनी सर्व सहभागी संघांचे कौतुक केले.
अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी शुभेच्छा
यंदा होणाऱ्या ७० व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन रेल्वे सुरक्षा दलामार्फत करण्यात येणार आहे. मागील अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस संघाने चांगली कामगिरी केली होती. यंदाही अधिक क्षमतेने सराव करून महाराष्ट्र पोलीस दलाने संस्मरणीय आणि उल्लेखनीय कामगिरी करावी, असा विश्वास श्री. दाते यांनी व्यक्त केला.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिवस-रात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे त्यांनी विशेष कौतुक केले. सर्वांच्या एकजुटीमुळेच मेळावा उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्याचे त्यांनी नमूद केले. व्यावसायिक कर्तव्य बजावताना जनतेप्रती असलेली जबाबदारी कायम लक्षात ठेवून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी सजग, सक्षम आणि सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित
या समारंभाला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री. सुनील रामानंद, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक श्री. दत्तात्रय पडसलगीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक श्री. राजकुमार व्हटकर, दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक श्री. नवल बजाज यांच्यासह विविध परिक्षेत्रांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस कुटुंबीय तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना कदम आणि पोलीस हवालदार श्री. सचिन देवडे यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस दलातील कौशल्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.














