पोलिस प्रशासन न्यूज.

कोयत्याचा धाक दाखवून रिक्षातील प्रवाशाची लूट; दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांत टोळीला जेरबंद केले


पुणे : टीम (लोक मिरर टाइम्स) रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी अजय चिंतामन देसलेपाटील (वय २९) हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरून प्रवास करत होते. एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोर अनोळखी रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्या पॅन्ट व शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.
याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ७८७/२०२६ नुसार बीएनएस कलम ३०९(४), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली. कोणताही ठोस सुगावा नसताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून रिक्षाचा क्रमांक मिळवला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख हा निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातून सुमारे १५ दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी शेखर बापू माने याच्याविरुद्धही जबरी चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये तसेच पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर, प्रविण बांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे आणि राजकुमार हणमंते यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करीत आहेत.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!