पोलिस प्रशासन न्यूज.

४ तोळे सोन्यासह ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्हे उघडकीस


मंचर : एसटी बसस्थानक परिसरात तसेच एसटी बसमध्ये महिलांच्या गळ्यातील व पिशव्यांमधील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस ठाण्याला सराईत तसेच पाहिजे आणि फरार आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलिसांची पथके मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मंचर एसटी बसस्थानकावर व एसटी बसमध्ये सोन्याचे दागिने चोरी करणारी टोळी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी मंचर एसटी बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अशोक बबन भासले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महिला साथीदार अश्विनी अविनाश भोसले हिच्या मदतीने महिलांच्या गळ्यातील तसेच पिशव्यांमधील सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी अशोक बबन भासले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड, सध्या हिवरगाव फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अश्विनी अविनाश भोसले (रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि सतीश मधुकर गोरे (रा. शिवाजीनगर, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेऊन अटक केली.

आरोपींकडून मंचर पोलीस ठाणे गु.र.नं. १४१/२०२६ व गु.र.नं. १२०/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील चोरीचे ४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

सदर प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!