पुणे : खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात मागील १५ दिवसांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले. विवेक उर्फ दांड्या सुरेश अडागळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीने फिर्यादीच्या नातेवाईकास नांदावयास पाठवत नसल्याच्या कारणावरून फिर्यादीसोबत वाद घातला. यावेळी शिवीगाळ करून घराच्या भिंतीचा तुटलेला विटेचा तुकडा फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदारांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत तसेच पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, किरण मोरे, अतुल साळवे,संतोष नागरे आणि निखील अहिवळे सचिन कोळी यांच्या पथकाने केली.














