पुणे: (लोक मिरर टाइम्स)गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २९ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चैन चोरी व मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
२५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री बुधवार पेठेतील बेलबाग चौकाजवळ गणेश विसर्जन मिरवणूक पाहत असताना सागर कमटी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लोखंडी कटरच्या साहाय्याने कापून चोरट्यांनी त्यांचा मोबाईलही चोरला होता. सहा जणांच्या टोळीने फिर्यादीला घेरून मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि पोलीस अंमलदार चेतन होळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील विजयपाल कबर सैन (वय ३४) याला ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपासादरम्यान आरोपीच्या इतर साथीदारांचाही सहभाग समोर आला. पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे दाखल गुन्ह्यासह आणखी १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
गर्दी, उत्सव आणि यात्रांच्या ठिकाणी भाविकांना चारही बाजूंनी घेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लोखंडी कटरने कापून चोरी करणे, अशी या टोळीची कार्यपद्धती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस निरीक्षक राजेश महाला, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच फरासखाना तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.














