पुणे : (लोक मिरर टाईम्स)पुणे शहर पोलिसांकडून फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-२ ने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एमपीडीए कारवाईअंतर्गत पाहिजे असलेला आरोपी आणि गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या अशा दोन आरोपींना सातारा जिल्ह्यातील म्हसवड परिसरातून जेरबंद करण्यात आले आहे. दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी युनिट-२ मधील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक आणि सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सहकारनगर पोलीस ठाण्यातील एमपीडीए कारवाईच्या अनुषंगाने दि. ३ ऑक्टोबर २०२६ पासून पाहिजे असलेला आरोपी अजित सागर कसबे (वय २१) तसेच सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून फरार असलेला ओंकार महेश थोरात (वय २५) हे दोघे सातारा जिल्ह्यातील म्हसवड परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट-२ च्या पथकाने म्हसवड येथे जाऊन स्थानिक म्हसवड पोलीस ठाण्याच्या मदतीने शोधमोहीम राबवली. यावेळी दोन्ही आरोपी मिळून आल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हे पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध सहकारनगर, भारती विद्यापीठ आणि पर्वती पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे तसेच पोलीस अंमलदार महेश मंडलिक, शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, कुंदन शिंदे, ओमकार कुंभार, योगेश मांढरे, शिवानंद कायगुडे, विद्या शिंदे, आशिष यादव आणि विनायक वगारे यांनी सहभाग घेतला. तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि पोलीस अंमलदार शहाजी वाघमारे, प्रकाश इंदलकर, अनिल वाघमोडे व सतीश जाधव यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.














