पुणे( लोक मिरर टाइम्स)शिवाजीनगर न्यायालय, मेट्रो स्टेशन आणि पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) शहरात खळबळ उडाली. मात्र, पोलिस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने केलेल्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही धमकी अफवा ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर न्यायालय आणि मेट्रो स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. तसेच पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरही अशाच प्रकारचा धमकीचा संदेश आला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, न्यायालयातील सुरक्षा यंत्रणा तसेच बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजीनगर न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली, तर मेट्रो स्टेशन परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालय, मेट्रो स्टेशन आणि पुणे महापौर कार्यालय परिसरात बीडीडीएस पथकाने कसून तपासणी केली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. संबंधित पथकाकडून सर्व ठिकाणांना निर्धोक प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नागरिकांनी अशा धमकीच्या संदेशांमुळे घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.














