पोलिस प्रशासन न्यूज.

पुणे शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल; प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहनांना प्रवेशबंदी, काही मार्गांवर नो-पार्किंग


पुणे प्रतिनिधी (सुनील सांबारे) लोक मिरर टाइम्स दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. याअंतर्गत लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गणेश पेठ, तपकीर गल्ली, कुमठेकर रोड, केळकर रोड आदी परिसरांत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

१. प्रमुख बाजारपेठांमध्ये मालवाहतूक वाहनांना वेळेची मर्यादा

लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, गणेश पेठ, तपकीर गल्ली, कुमठेकर रोड, केळकर रोड, बाजीराव रोड व मध्यवर्ती भागातील दुकानांसाठी मालाची ने-आण करणाऱ्या हलक्या मालवाहू वाहनांना दि. २६ ऑक्टोबर २०२६ ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेत माल लोडिंग-अनलोडिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळेबाहेर संबंधित परिसरात मालवाहतूक करण्यावर निर्बंध राहतील.

२. शिवाजीनगर वाहतूक विभागात पार्किंगबाबत बदल

शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत प्राईड हॉटेल ते दक्खनी हॉस्पिटल कॉर्नरपर्यंत सुमारे २२० मीटर मार्गावर दोन्ही बाजूंना सर्व वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एल.आय.सी. ऑफिस ते राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयापर्यंत सुमारे ४०० मीटर मार्गावर दोन्ही बाजूंना नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

३. कोरेगाव पार्क परिसरात पार्किंगचे नियोजन

कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत वृंदावन हाऊसिंग कॉम्प्लेक्स गेट क्रमांक २ च्या दोन्ही बाजूंना सुमारे १० मीटर परिसरात नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहनांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांना वाहतूक पोलिसांचे आवाहन

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करू नयेत, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सण सुरक्षित व शांततेत पार पडण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!