पुणे (टीम लोक मिरर टाइम्स )पुणे शहरातील बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला बालेवाडी हायस्ट्रीट येथील मोकळ्या जागेत एक व्यक्ती अवैध अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून संशयास्पद हालचाली करणाऱ्या आदित्य दशरथ औचरे (वय २२) याला ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२६ अन्वये आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलूमुला रजनीकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल केकान, गणेश रायकर तसेच पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदीप खरात, गजानन अवातिरक, स्वप्नील मराठे, गणेश भोईने आणि समीर पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.














