पोलिस प्रशासन न्यूज.

अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने महिलेची ऑनलाइन फसवणूक; येरवडा पोलिसांनी परत मिळवून दिले ४० हजार रुपये


पुणे (टीम लोक मिरर टाइम्स) सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असताना, येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने प्रभावी कामगिरी करत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीतील संपूर्ण ४० हजार रुपयांची रक्कम तक्रारदार महिलेला परत मिळवून दिली आहे. अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप इन्स्टॉल झाल्याने ही फसवणूक झाली होती.

येरवडा परिसरातील एका महिलेने मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये ‘Joy VPN’ नावाचे संशयास्पद ॲप इन्स्टॉल झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेदरम्यान त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सायबर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली.

सायबर पथकाने संबंधित महिलेच्या मोबाईलची तपासणी करून संशयास्पद ॲप आणि मोबाईलच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींवर आवश्यक उपाययोजना केल्या. तसेच फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधित बँक व मर्चंट यांच्याशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला. फोनद्वारे संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि महिलेची संपूर्ण ४० हजार रुपयांची रक्कम परत मिळाली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे आणि केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस अंमलदार समीर पिलाने, मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे तसेच महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोकसे आणि मीनाक्षी कापडे यांनी सहभाग घेतला.

नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे!

मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. संशयास्पद ॲप इन्स्टॉल करणे टाळावे आणि बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!