पोलिस प्रशासन न्यूज.

पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचा पर्दाफाश; बिहारमधून दोघांना अटक


पुणे : (सुनील सांबारे) लोक मिरर टाइम्स खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २२ वर्षीय तरुणाने इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात ऑनलाइन ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट इन्स्टाग्राम अकाउंट आणि टेलिग्राम व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणाला जाळ्यात ओढून, अश्लील व्हिडिओच्या रेकॉर्डिंगचा वापर करत तसेच ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्याच्याकडून १ लाख ७७ हजार रुपये उकळल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी बिहारमधील पटना परिसरातून आकाशकुमार संजय सिंग (वय १८ वर्षे २ महिने) आणि राजकुमार संपूर्ण आनंद सिंग (वय २२ वर्षे) या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण ३० सप्टेंबर २०२६ रोजी घरातून निघून गेला होता. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खराडी येथील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत तरुणाच्या वडिलांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीत, मुलाला फोनद्वारे धमकावून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  तपासादरम्यान आरोपींनी RVCJ INSTA या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करणाऱ्या मुलींच्या नावाने बनावट अकाउंट तयार केल्याचे समोर आले. या अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी तरुणाशी संपर्क साधला आणि त्याला टेलिग्रामवर व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून कॉलचे रेकॉर्डिंग करण्यात आले. या रेकॉर्डिंगच्या आधारे ब्लॅकमेल करत आणि ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत विविध बँक खात्यांवरून एकूण १.७७ लाख रुपये उकळण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी बिहारमधील गोपालगंज आणि पटना परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले. २० ऑक्टोबर रोजी पटना येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. २१ ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सात मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि एक टॅब, असे एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले.

या गुन्ह्याच्या आर्थिक तपासात मृत तरुणाने पाच वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले. सायबर पथकाने आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत खंडणीच्या रकमेपैकी १ लाख १४ हजार ४९८ रुपये होल्ड करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणातील अनिकेत गुप्ता (रा. लुधियाना, पंजाब) तसेच खंडणीची रक्कम स्वीकारणारे बँक खातेधारक आणि इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना पुण्यातील न्यायालयात हजर केले असता ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे, गणेश घुले आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

नागरिकांना आवाहन: सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट, व्हिडिओ कॉल आणि अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याच्या धमक्यांपासून सावध राहावे. ब्लॅकमेलिंग किंवा ऑनलाइन खंडणीचा प्रकार घडल्यास घाबरून पैसे पाठवू नयेत. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!