पोलिस प्रशासन न्यूज.

युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये गरबा-दांडियाचा जल्लोष; संस्थापक प्राचार्य दत्तात्रय कोबरणे सर विद्यार्थ्यांसोबत थिरकले!


लोहगाव, पुणे : युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेत आयोजित गरबा-दांडिया उत्सवात विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य यांनी एकत्र सहभागी होत नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेचे संस्थापक व प्राचार्य दत्तात्रय कोबरणे सर यांचा विद्यार्थ्यांसोबतचा उत्स्फूर्त सहभाग.

पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून कोबरणे सर यांनी विद्यार्थ्यांसोबत गरबा-दांडिया खेळत आनंदाचे क्षण अनुभवले. मुलांमध्ये मूल होऊन त्यांच्यासोबत थिरकणाऱ्या त्यांच्या या उत्साही सहभागामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यातील जिव्हाळा, आपुलकी आणि एकात्मतेचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले.

शिक्षकांनी साकारली नवदुर्गेची नऊ रूपे!

नवरात्रोत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने शाळेत एक अनोखा उपक्रमही राबविण्यात आला. यावेळी शिक्षकांनी नवदुर्गेची नऊ रूपे साकारून विद्यार्थ्यांना देवीच्या प्रत्येक रूपाचे महत्त्व समजावून सांगितले.

देवी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक देवीच्या रूपामागील धार्मिक आणि सांस्कृतिक संदेश, नवरात्रोत्सवाचे महत्त्व तसेच भारतीय परंपरेतील या उत्सवाचे स्थान विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले.

शिक्षणासोबत संस्कार आणि आनंदाची जोड

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रम, सण-उत्सव आणि सामूहिक कार्यक्रम महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. गरबा-दांडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंद अनुभवला, तर नवदुर्गेच्या नऊ रूपांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक मूल्यांची ओळख करून घेतली.

युनिक इंटरनॅशनल स्कूलमधील हा नवरात्रोत्सव आनंद, संस्कार, सांस्कृतिक जाणीव आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांच्या आनंदात मनापासून सहभागी होणारे संस्थापक प्राचार्य दत्तात्रय कोबरणे सर आणि शिक्षकांच्या या उपक्रमामुळे शाळेतील उत्सवाला विशेष रंगत आली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!