पुणे:(टीम लोक मिरर टाइम्स )अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवतानाच व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना सुधारण्याची संधी देण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ ३ कडून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम ६४(अ) अंतर्गत १२ व्यक्तींनी व्यसनमुक्ती उपचारांचा एक महिन्याचा कालावधी पूर्ण केला असून, त्यापैकी ९ प्रकरणांत न्यायालयाने डिस्चार्ज दिला आहे. उर्वरित ३ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे, नऱ्हे, उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात आली. संबंधित व्यक्तींना किरकटवाडी येथील आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.
चार पोलीस ठाण्यांतून प्रभावी कार्यवाही
पोलीस ठाणेनिहाय आकडेवारीनुसार, वारजे आणि नऱ्हे पोलीस ठाण्यांच्या प्रत्येकी तीन प्रकरणांपैकी अनुक्रमे एका आणि दोन प्रकरणांत न्यायालयाने डिस्चार्ज दिला. उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यांच्या प्रत्येकी तीनही प्रकरणांत न्यायालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
काय आहे कलम ६४(अ)?
एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ६४(अ) हे कायद्यातील निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या पात्र व्यक्तींना व्यसनमुक्ती उपचार घेण्याच्या माध्यमातून अभियोजनापासून सशर्त संरक्षण मिळण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा उद्देश पात्र व्यसनाधीन व्यक्तींना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई, व्यसनाधीनांना सुधारणेची संधी
अमली पदार्थांचे सेवन ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नसून आरोग्य आणि सामाजिक जीवनाशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री, तस्करी व वितरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींना उपचारांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर परिमंडळ ३ पोलिसांकडून भर देण्यात येत आहे.
“अमली पदार्थ विक्रेत्यांसाठी कठोर कायदा आणि व्यसनाधीन व्यक्तींसाठी उपचार व पुनर्वसनाची संधी, हीच पोलिसांची भूमिका आहे,” अशी भूमिका पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी मांडली.
व्यसनमुक्त व्यक्ती, सुरक्षित कुटुंब आणि अमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुणे शहर पोलिसांचा हा पुनर्वसनाभिमुख पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे.














