पुणे | टीम (लोक मिरर टाइम्स) कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली ७ लाख ७ हजार ३६० रुपये किमतीची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोथरूड येथील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी कॉपर वायर चोरून नेली होती. याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना चौकी अंमलदार योगेश सुळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी दोन संशयित डुक्कर खिंड सर्व्हिस रोड, कोथरूड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण व त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अहमद रजा इसरार अहमद खान (वय २२) आणि फैय्याज मेराज शहा (वय २०), दोघेही रा. तुलसीपूर, जिल्हा बलरामपूर, उत्तर प्रदेश, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडील पांढऱ्या गोणीमध्ये कॉपर वायर आढळून आली. चौकशीदरम्यान ही वायर उजवी भुसारी कॉलनीतील बांधकामाच्या ठिकाणाहून चोरी केल्याचे त्यांनी कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण ७,०७,३६० रुपये किमतीची कॉपर वायर हस्तगत करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण करीत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक सुनील कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप घुले, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तसेच पोलीस अंमलदार योगेश सुळ, गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदीप जवादे, सूरज कदम आणि उमेश राऊत यांच्या पथकाने केली.














