पोलिस प्रशासन न्यूज.

वाघोली पोलिसांची मोठी कारवाई! चार देशी बनावटीची पिस्टल, १५ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक, एक विधिसंघर्षित बालक ताब्यात


पुणे | प्रतिनिधी लोक मिरर टाइम्स पुणे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी पॅलेस ते जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरीत्या दोन दुचाकींसह थांबलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्टल, चार मॅगझीन आणि १५ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी केसनंद परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार प्रदीप मोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित ठिकाणी काही इसम पिस्टलसह थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चार देशी बनावटीची पिस्टल, चार मॅगझीन, १५ जिवंत काडतुसे, २० हजार रुपये रोख रक्कम आणि चार मोबाईल फोन आढळून आले. तसेच हिरो होंडा स्प्लेंडर आणि केटीएम अशा दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या.

ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे :

  1. आकाश ऊर्फ गज्या अशोक मोरे (वय २१, रा. वडगावशेरी, पुणे)
  2. मनिष दिलीप फर्नाडीस (वय २६, रा. चांदोर, मडगाव, दक्षिण गोवा)
  3. चंद्रेश्वर मल्लेशी चारी (वय २१, रा. चांदोर, मडगाव, दक्षिण गोवा)
  4. एक विधिसंघर्षित बालक.

४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी एकूण ४,१८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार पिस्टल (१,८०,००० रुपये), १५ जिवंत काडतुसे (७,५०० रुपये), दोन दुचाकी (१,७०,००० रुपये), चार मोबाईल (४०,००० रुपये) आणि २० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.

याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी ही पिस्टल नेमकी कोठून आणली आणि कोणत्या उद्देशाने आणली होती, याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु करीत आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ-७ श्री. अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु, पोलीस हवालदार प्रदीप मोटे, पोलीस शिपाई भोईने, अशोक शेळके, महादेव कुंभार, मारुती वाघमारे, विशाल गायकवाड आणि मंगेश शेळके यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.


9
कृपया वोट करा

लोक मिरर TIMES च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!